सिंहगडाचा पश्चिम कडा सर करून तरुणाईची तानाजींना मानवंदना, नरवीर तानाजींच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण


पुणे- माघ वद्य नवमीची रात्र.. साल होते १६७०..घनघोर काळोख्या रात्री नरवीर तानाजी मालुसरेंनी आपल्या साडेतीनशे मावळ्यांसह कोंढाणा किल्ल्याच्या पश्चिमकड्याला दोर बांधून गडावर हल्ला केला आणि प्राणांची आहुती देऊन किल्ला शिवछत्रपतींच्या स्वराज्यात सामील केला. या घटनेला सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत.


हे औचित्य साधून सुभेदारांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी साडेतीनशे युवक-युवतींनी तोच पश्चिम कडा शनिवारी रात्री दोर लावून सर केला आणि सुभेदारांना अनोखी मानवंदना दिली.


इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित या उपक्रमात साडेतीनशे युवक-युवती मावळ्यांच्या पोशाखात सहभागी झाले होते. सर्जिकल स्ट्राइकचे रणनीतीकार निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


त्या काळी आपल्या जिगरबाज मावळ्यांनी सुभेदारांच्या नेतृत्वाखाली पश्चिम कडा कसा चढला असेल, कोणती युद्धनीती आखली असेल, गनिमी काव्याचा कसा प्रभावी वापर केला असेल, हल्ल्यापूर्वी संपूर्ण गडाचा किती बारकाईने अभ्यास केला असेल याची कल्पना आजही त्याच मार्गाने किल्ला दोरावरून चढताना येत होती आणि पूर्वजांच्या पराक्रमाने रोमांचित होत होतो, अशी भावना सौरभ जगताप या मावळ्याने व्यक्त केली.


इतिहास विसरलो तर भूगोलाची शाश्वती नाही


‘इतिहास विसरलो तर भूगोलाची शाश्वती देता येत नाही. आपला इतिहास आपण माहिती करून घेतला पाहिजे. अन्यत्र फिरण्यापेक्षा आपल्या गडकिल्ल्यांवर गेले पाहिजे. तिथे घडलेला पराक्रम समजून घेतला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे तर त्यातून नव्या पिढीला प्रेरणा घेता येईल,असे या वेळी राजेंद्र निंभोरकर म्हणाले.