इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी, मूल जन्माचा 'फॉर्मुला' सांगून सापडले वादात

शिर्डी - मुलगा आणि मुलीच्या जन्मावर वादग्रस्त विधान करून टीकेचे केंद्र बनलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदुरीकरांनी मंगळवारी एक पत्रक जारी करून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले आहे. "समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षांच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंग्रह, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध जाचक रुढी परंपरा इत्यादी विषयांवर मी भर दिला. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी." असे त्यांनी पत्रकामध्ये लिहिले आहे.


पत्रकामध्ये इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले...



  • महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग, आजतागत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल आणि इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.

  • तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!


असा आहे वाद...


इंदुरीकरांनी नुकतेच आपल्या एका कीर्तनामध्ये मुलगा होण्यासाठी काय करावे आणि मुलगी कशी होते याचा कथित फॉर्मुला सांगितला होता. मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये ते बोलतात, "स्त्री संगम सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते." याच विधानावरून राज्यभरात त्यांच्यावर टीका करण्यात आली. इंदुरीकरांवर टीका करणारे आणि त्यांचे समर्थन करणारे असे दोन वर्ग तयार झाले होते. वाढता वाद पाहता त्यांनी यानंतर झालेल्या आपल्या कीर्तनामध्ये कीर्तन सोडून शेती करण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती.